श्री. घृष्णेश्वर देवस्थानच्या विकास आराखड्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण

0
425

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथील श्री. क्षेत्र घृष्णेश्वर देवस्थानच्या विकास आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

तीथक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भातील शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात झाली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, औरंगाबादचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रशांत बंब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड आदी यावेळी उपस्थित होते.


सादरीकरण करताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, वेरुळ येथील गट क्र. 4 मधील अंदाजे 20 एकर जागेवर हा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. या विकास आराखड्यात एकूण 33 गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये फुलांच्या दुकानांसाठी जागा, स्मार्ट कार्डद्वारे पिण्याच्या पाण्याचे वितरण, स्वागतद्वार, नियंत्रण कक्ष, सौरऊर्जेवरील प्रकाश व्यवस्था, सुरक्षा रक्षक केबिन, सीसीटीव्ही, 13 उपहारगृहे, दोन भक्त निवास, वाचन कक्ष, दोन एकर जागेवर वाहनतळ, सुंदर दीपमाळ, सर्वात मोठा नंदी, कार्यक्रमासाठी सभागृह, ॲम्पि थिएटर, माहिती फलक, घन कचरा व्यवस्थापनाची सुविधा आदी विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच रुद्राक्षाच्या रचनेतील बागेची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी भगवान महादेवाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार असून सभोवती 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रतिकृती असणार आहेत. या ठिकाणी लेझर शो, रंगीत कारंजे आदीही असणार आहेत. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या आराखड्यात पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी 87.41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री. राम यांनी दिली.

Previous articleRailway should add Vistadome coach to Mumbai- Jalna Janshatabdi
Next articleऔरंगाबादच्या कचरा प्रश्नावर अखेर निघाला तोडगा, औरंगाबाद कचरा प्रश्नावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here