देखणा वेताळवाडी किल्ला

अंतुर आणि जंजाळा किल्ल्यानंतर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आपली मार्गक्रमणा सुरु ठेवताना पुढचा किल्ला आहे वेताळवाडीचा. ह्या किल्ल्याला आज पायथ्यालगतच्या वेताळवाडी गावावरून ओळखले जाते. इतिहास संशोधकांच्या मते ह्याला वसईचा किल्ला असेही नाव आहे. (ठाणे जिल्ह्यातला पोर्तुगीजांचा वसई किल्ला तो वेगळा!) हे नाव कसे आणि कुणी दिले हे मात्र आपल्याला माहित नाही. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अंतुर आणि जंजाळासारख्या एकेकाळी काही वस्ती पोटात बाळगून असणाऱ्या किल्ल्यांपैकी हा आपला वसईचा किल्ला.

उत्तर मराठवाड्यातल्या अनेक किल्ल्यांसारखाच ह्या किल्ल्याचा इतिहाससुद्धा आपल्याला अज्ञात आहे. कुणी, कधी आणि का बांधला हे अजूनतरी त्या निर्मात्यालाच ठाऊक!! शिलालेख, नाणी वा तत्कालीन स्थापत्यशैलीच्या खुणांअभावी किल्ल्याच्या चालुक्य अथवा यादवकालीन अस्तित्त्वाविषयी सांगणे अवघड आहे. पंधराव्या शतकानंतर औरंगाबाद व लगतच्या प्रदेशावर राज्य केलेले अहमदनगरचे निज़ाम, नंतर मुघल आणि पुढे असफजहां म्हणजे हैदराबादच्या निज़ाम राज्यकर्त्यांकडे ह्या किल्ल्याचा कब्जा असेल असा आपण फक्त कयास बांधू शकतो.

परंतु उत्तर मध्ययुगीन स्थापत्यरचनेचे अनेक अवशेष आजही अंगावर बाळगून असलेला वेताळवाडीचा हा किल्ला सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यांच्या सीमेवर २०३३’१२.४” उ. अक्षांश आणि ७५३७’१७.२” पू. रेखांशांवर उभा आहे. उत्तरेकडील आक्रमणांवर नजर ठेवायला अत्यंत मोक्याचे असे ह्याचे भौगोलिक स्थान आहे. सोयगाव तालुक्यातल्या वेताळवाडीकडून हळदा गावाकडे घाट रस्त्याने जाताना डावीकडे अख्ख्या डोंगरालाच जणू कवेत घेणारी किल्ल्याची मजबूत परंतु सुबक तटबंदी दिसते. घाटरस्ता सोडून पाऊलवाटेने गड चढायला लागल्यावर दोन भरभक्कम बुरुज आपले स्वागत करतात. त्यानंतर लगेच एक नक्षीदार सज्जा असणारा बुरुज आहे.

पुढे काटकोनात वळून पाउलवाट तटबंदीत बेमालूम लपवलेल्या पश्चिमेच्या जंजाळा किल्ल्याच्या दिशेने तोंड असणाऱ्या भव्य जंजाळा दरवाज्याकडे नेते. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला शरभ शिल्पे आहेत. आत प्रवेश केल्यावर सैनिकांसाठी मोठ्या देवड्या, दारुगोळा साठवण्याचे कोठार आणि दर्शनी बुरुजांवर जाणारा जीना आहे. पाउलवाट तशीच पुढे अजून वरच्या बाजूला असलेल्या बुरुजांच्या कडेने बालेकिल्ल्यात जाते.

इथे असलेले बुरुज आणि भिंतीचे अवशेष खालचा किल्ला व बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी एकेकाळी असलेली दुहेरी तटबंदीची योजना दर्शवितात. किल्ला चढायला फार अवघड नसल्याने संरक्षणासाठी वळणावळणाची दुहेरी तटबंदी, भक्कम बुरुज, खालच्या शत्रूवर मारा करण्यासाठी योग्य अंतरांवर जंग्या अशी आवश्यक सामरिक रचना केलेली आहे. किल्ल्यावरच्या बुरुजांची रचनासुद्धा खालच्या प्रदेशावर अहोरात्र टेहळणी करता येईल अशीच आहे.

बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करताच एक घुमटाकार इमारत, तेला-तुपाचे टाके आणि धान्याचे कोठार लागते. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी असलेला आज योग्य निगा न राखल्यामुळे कोरडा पडलेला पाण्याचा मोठा तलाव त्याकाळी मात्र किल्ल्यातील पाण्याची गरज सहज भागवू शकत असणार हे नक्की. तलावाच्या काठी नमाजगीर मशीदीची भग्न इमारत आहे. ह्या इमारतीच्या समोरच्या भिंतीवर निज़ामाचे चिन्ह अणि एक क्रॉस कोरलेले दिसतात. उत्तरेकडे कमानीच्या दोन रांगा असलेली इमारत उन्हाळ्यात हवेशीर बारादारीसारखी आहे. इथून खाली वेताळवाडी गावाकडे जाणाऱ्या वाटेवर अजून एक भव्य दरवाजा आहे. ह्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना असलेली शरभ शिल्पे अणि आतमधे देवडया आजही दिसतात. इथून पुढे गेल्यावर तटबंदीतून खाली उतरायला एक चोर दरवाज़ा आहे.

आज काही भग्नावशेष आणि मजबूत तटबंदीशिवाय वेताळवाडीच्या ह्या आपल्या किल्ल्यावर इतिहासाची उकल होण्यात मदत होईल असे फार काही हाती लागत नसले तरीही दक्खनच्या ह्या पहारेदाराला भेट देऊन इतिहासातले त्याचे हरवलेले पान आणि स्थान परत एकदा मिळवता येईल का ते पाहायला हरकत नाही…. काय म्हणता!!

 

वेताळवाडी किल्ला
किल्ल्याची ऊंची :  1900ft
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
श्रेणी : मध्यम

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परीपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाण्यासारखी आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी जंजाळा गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्लासुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.

२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.

स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी 
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव – वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.

राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :
जेवणाची सोय गडावर नाही, सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.

पाण्याची सोय :
गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. पाणी बरोबर बाळगावे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) वेताळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी ४५ मिनीटे लागतात. २) हळदा घाट रस्त्यावरून गडावर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात.

Previous article13th Heritage Walk to cover city temples
Next articleMagnetic Maharashtra: AURIC, Delhi-Mumbai industrial corridor to be showcased

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here